निवडणुकीत पैशाचा इतका खेळ कधीच नव्हता: संजय राऊत

Foto
मुंबई : एक महिन्यापेक्षा जास्त काळ मी कैदखान्यात आहे. घरच्या आणि रुग्णालयाच्या. माननीय उद्धव ठाकरेंचं माझ्यावर बारीक लक्ष आहे मी कुठे बाहेर पडतोय का? याकडे. आत्ताही त्यांची परवानगी नाही असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. संजय राऊत यांनी आजारपणानंतर अनेक दिवसांनी पहिल्यांदाच पत्रकार परिषद घेतली. त्यात त्यांनी एकनाथ शिंदेंवर आणि भाजपावर टीका केली.

मी बरा असतो तर नगरपालिका प्रचारासाठी महाराष्ट्रात फिरलो असतो. शिंदे गटाच्या गुलाबो गँगने सांगितलं आहे १ तारखेला लक्ष्मीदर्शन होणार आहे. आता निवडणूक आयोगाने याची दखल घेतली पाहिजे. काही ठिकाणी १० हजार किंवा १५ हजार एका मतामागे असं लक्ष्मी दर्शन सुरु आहे. नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकांमध्ये पैशांचा इतका खेळ कधीही झाला नव्हता. राज्याचे मुख्यमंत्री किंवा सरकार या निवडणुका लढवतच नव्हते. स्थानिक पातळीवरच या निवडणुका होत होत्या. आता पाच-सहा हेलिकॉप्टर्स, खासगी विमानं हे सगळं पाहण्यास मिळतं आहे. आम्ही निवडणुका स्थानिक कार्यकर्त्यांवर सोडल्या आहेत. लोक म्हणतात विरोधक निस्तेज आहेत, तसं मुळीच नाही. या राज्याची निवडणूक संस्कृती उद्ध्वस्त झाली आहे. मागच्या चार ते पाच वर्षांत देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृ्त्वात संस्कृती उद्ध्वस्त झाली आहे. सध्याच्या घडीला तू मोठा की मी मोठा अशी स्पर्धा तीन सत्ताधारी पक्षांमध्ये चालली आहे.

शिंदे सेनेचा कोथळा अमित शाहच काढतील-संजय राऊत

एकनाथ शिंदेंची शिवसेना असं मी म्हणायला तयार नाही. शिवाय शिंदे सेनेचा कोथळा अमित शाहच काढणार आहेत, असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे.राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची भेट झाली. उद्धव ठाकरेंना राज ठाकरेंनी एक प्रेझेंटेशन दाखवलं. त्यांचं जे काही चाललं ते उत्तम चाललं आहे. एकनाथ शिंदे काय म्हणतात ते महत्त्वाचं नाही. काँग्रेसने आमच्या बरोबर असणं ही आमची भूमिका आहे. बिहार निवडणुकीच्या निकालानंतर जर काँग्रेसचा आत्मविश्वास वाढला असेल तर त्यांनी मुंबई महापालिकेच्या निवडणुका स्वतंत्र लढाव्यात असंही संजय राऊत म्हणाले. राज ठाकरे बरोबर आल्याने भाजपाचा पराभव होणार आहे. मुंबईचा शत्रू म्हणजे भारतीय जनता पक्ष आहे. अदाणींच्या घशात मुंबई घातली जाते आहे. ते थांबवायचं असेल तर राज ठाकरेंना बरोबर घेणं आवश्यक आहे असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

संजय राऊत बरे झाले याचा आम्हाला आनंद आहे. त्यांनी त्यांचं काम करावं आम्ही आमचं काम करतो. संजय राऊत हे रोज काय बोलतात त्याला उत्तर देणं मी महत्त्वाचं समजत नाही असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. दरम्यान मी आजारी असताना देवेंद्र फडणवीस यांनी माझी चौकशी केली आणि मदतीचं आश्वासन दिलं. नरेंद्र मोदींनी माझी चौकशी केली, मला फोन आला होता. एकनाथ शिंदेंनी फोन केला होता. कारण राजकारणा पलिकडे काही नाती जपायची असतात असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे.